कोल्हापूर : जिल्ह्यात पाचट व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष, तीन तालुक्यांतच गती

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात यंदा १ लाख ९६ हजार हेक्टरवर ऊस पिकाची नोंद होती. त्यामध्ये ५० ते ५५ टक्के खोडवा आहे, तर सन २०२६-२७ साठी पुन्हा ४५ टक्के क्षेत्रावर नव्याने उसाची लागण झाली आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने सन २००९ पासून पाचट व्यवस्थापनाची संकल्पना अंमलात आणली. मात्र, जवळपास १७ वर्षानंतरही त्याला फारशी गती मिळालेली नाही. एकूण ऊस क्षेत्रापैकी अवघ्या ३० ते ३५ टक्के क्षेत्रावरील उसात पाचट ठेवण्यात आले आहे. यात शिरोळ, हातकणंगले, कागल, करवीर तालुके आघाडीवर आहेत. ऊस तोडणीनंतर पाचट न जाळता ते सरीत कुजवले, तर पिकाला अधिक फायदेशीर ठरते हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. पण याबाबत म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही.

सध्या जिल्ह्यातील एकूण ऊस क्षेत्रापैकी १५ टक्के ऊस हार्वेस्टरच्या सहाय्याने तोडला जातो. उर्वरित उसाची तोडणी मजुरांद्वारे केली जाते. यंत्राद्वारे तोडलेल्या उसाच्या पाल्याची कुट्टी होते. शेतकरी ती कुट्टी जाळत नाहीत. तर काही शेतकरी पाल्याची कुट्टी करण्यासाठी यंत्राचा वापर करतात. काही शेतकरी पाला एक आड एक सरीत ठेवतात. त्यामुळे त्याचा फायदा पिकाला होतो. मात्र, ऊस तुटून गेल्यानंतर जमीन स्वच्छ करण्याच्या हेतूने ८० ते ९० टक्के शेतकरी उसाचा पाला जाळून टाकतात. यात ५ टक्के म्हणजे सुमारे हेक्टरी ५०० किलो राख शिल्लक राहते. मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होते. उष्णतेने जमिनीची व त्यातील उपयुक्त जीवजंतू व गांडुळांची हानी होते. त्यामुळे उसाचा पाला एक आड एक सरीत कुजवला, तर पिकासह जमिनीला तो पोषक ठरेल, हे ऊस शेतीतील फायदे शेतकऱ्यांना पटवून देण्यात कृषी विभाग अपयशी ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here