कोल्हापूर : राज्यात गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून यंदा ११८० लाख टन ऊस गाळप आणि १०८० लाख क्विंटल (१०८ लाख टन) साखर उत्पादन होईल, असा अंदाज साखर आयुक्तालयात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत ‘चीनीमंडी’शी बोलताना राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते म्हणाले कि, राज्यातील साखर उत्पादनाचा आढावा घेण्यासाठी मिटकॉन, कृषी विभाग, विस्मा, साखर संघ यांच्या प्रतिनिधींची मंगळवारी साखर आयुक्तालयातर्फे बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत आतापर्यंत झालेल्या गाळप हंगामाचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर राज्यात शिल्लक असलेला ऊस, त्याची संभाव्य रिकवरी यावर सांगोपांग चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्व उपस्थित तज्ञांचा अंदाज, ग्राउंड रिपोर्ट याची माहिती घेऊन ऊस गाळप आणि साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
१५ मार्चपर्यंत संपेल गाळप हंगाम…
१० फेब्रुवारीपर्यंत राज्यात १०२ सहकारी आणि १०५ खाजगी असे एकूण २०७ साखर कारखाने सुरु होते. या साखर कारखान्यांनी ९१८ लाख टन उसाचे गाळप करून ८५६.०७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.३३ टक्के इतका आहे. साखर आयुक्ताल्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यात अजून २६० लाख टन उसाचे गाळप आणि २२० लाख क्विंटल साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम काही एक-दोन कारखान्यांचा अपवाद वगळता फेब्रुवारीअखेर संपण्याची शक्यता बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातील कारखाने १५ मार्चपर्यंत सुरु राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मागील हंगामापेक्षा २७ लाख टन जादा साखर उत्पादन शक्य
राज्यात २०२३ – २४ गाळप हंगामात ११० लाख टन साखर उत्पादन झाले होते. तर २०२४ – २५ मध्ये साखर उत्पादनात तब्बल २९ लाख टनाची घट होऊन केवळ 81 लाख टन साखर उत्पादन झाले होते. मात्र मागील वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला होता. उसाची वाढही चांगली झाली हतो. त्यामुळे मागील दोन हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात पोहचला आहे. पुढील काही दिवसांत साखर कारखान्यांची धुराडी हळूहूळ बंद होण्यास सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर २०२३-२४ च्या गळीत हंगामातील ११० लाख टन साखर उत्पादनाचे रेकॉर्ड अबाधित राहण्याची शक्यता आहे, तर २०२४-२५ च्या हंगामापेक्षा २७ लाख टन अधिक साखर उत्पादन शक्य आहे.

















