पुणे : श्री छत्रपती कारखान्यांमध्ये १०० चेअरमन आणि १०० संचालक मंडळ होतील. परंतु संस्था कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने आपल्याला श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना पुन्हा पहिल्या क्रमांकावर न्यायचा आहे, असे मत श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी व्यक्त केले. जाचक म्हणाले, या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये संचालक मंडळ, अधिकारी, कामगार यांनी अतिशय काळजीपूर्वक उत्कृष्टपणे कारखाना चालवला. याच पद्धतीने आपल्याला पुढील हंगाम पार पाडायचे आहेत. किमान १० लाखांपर्यंत उसाचे गाळप होईल, असे वाटत होते. परंतु, जास्त पावसामुळे उसाचे उत्पादन घटले. त्यामुळे अपेक्षित गाळप होऊ शकले नाही.
श्री छत्रपती कारखान्याने या वर्षीच्या गाळप हंगामात १०४ दिवसांमध्ये ७ लाख ५६ हजार २८५ टन उसाचे गाळप करून ८ लाख ५६ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पातून आतापर्यंत ३ कोटी ९२ लाख ५१ हजार ३०० युनिट वीजनिर्मिती झाली आहे. त्यामधून अंतर्गत विजेचा वापर वजा करता २ कोटी ५७ लाख ६६ हजार युनिट विजेची निर्यात झाली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत साखर उताऱ्यात वाढ होऊन साखर उताऱ्यात छत्रपती कारखाना पुणे जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
श्री छत्रपती कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता करण्यात आली, या वेळी कारखान्याच्या संचालिका सुचिता सपकळ व सचिन सपकळ यांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास गावडे, संचालक अॅड. शरद जामदार, शिवाजी निंबाळकर, रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव, जनरल मॅनेजर हनुमंत करवर, तांत्रिक सल्लागार महादेव निकम, कामगार नेते युवराज रणवरे आदी उपस्थित होते.
यंदाचा हंगाम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ, सभासद, बिगर सभासद, अधिकारी, कामगार, ऊसतोडणी, वाहतूक कंत्राटदार, तोडणी करणारे मजूर या सर्वच घटकांचे योगदान आहे. कारखाना कमीत कमी स्टॉपेजेसवर चालला असून, सिरप जामिंग तर कधीच झाले नाही. एका क्लीनिंगमध्ये कारखान्याचा गाळप हंगाम पार पडला. सभासदांच्या उसाचे वेळेत गाळप करण्याचे नियोजन संचालक मंडळाने केले, सभासदांवर आर्थिक ताण पडू नये, यासाठी कारखाना येणे बाकी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेअरची येणे रक्कम भरण्यास मुदतवाढ देण्यात आली.
सुरू व पूर्वहंगामी उसास प्रतिटन ७५ रुपये व खोडव्यास १०० रुपये प्रतिटन अनुदान जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर १६ जानेवारीपासून गाळपास येणान्या उसाला सरसकट प्रतिटन १०० रुपये अनुदान जाहीर करण्यात आले. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊ नये, यासाठी संचालक मंडळाने वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या. परंतु, काही सभासदांनी इतर कारखान्यांना गाळपासाठी ऊस दिला. कारखाना आर्थिक संकटांचा सामना करीत असून, कारखान्याच्या ऊस गाळप व साखर उताऱ्यामध्ये वाढ झाली, तरच कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर येणार आहे, ही जाणीव ठेवून ज्या सभासदांनी कारखान्यास गळितास देऊन सहकार्य केले, त्यांचे आभार मानण्यात आले.

















