कोल्हापूर : सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्याने यावर्षी हंगाम लवकर संपण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यातील काही कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातून अनेक ऊसतोड मजुरांच्या टोळ्या प्रापंचिक साहित्य ट्रॉलीमध्ये भरून गावी परतताना दिसत आहेत. मजुरांच्या कुटुंबीयांची पाल्यावर आवराआवर सुरू आहे. अनेक कुटुंबे आपल्या गावी मार्गस्थ झाली असून, अनेक कुटुंबे सध्या परतीच्या वाटेवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांचा हंगाम संपला असून, उर्वरित कारखान्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शेवटची खेप वाजत गाजत काढण्यासाठी वाहनधारकांचे तयारी सुरू आहे.
यंदा अती पाऊस, रोगांचा फैलाव यातूनही शेतकऱ्यांनी ऊस पीक सावरले. काला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षांपासून शिरोळ तालुक्यातील नदीकाठी असणाऱ्या उसाचे मोठ्या प्रमाणावर बुडून नुकसान होत आहे. यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी पर्यायी व्यवस्था पाहत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी आपला ऊस रोपवाटिका आणि चाऱ्यासाठी विक्री केला आहे. तालुक्यात सुमारे तीनशेहून अधिक रोपवाटिका सुरू आहेत. येथील रोपांना महाराष्ट्र तसेच कर्नाटक, गुजरातमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे रोपवाटिकांसाठी दररोज सुमारे दीडशे टन उसाची तोड झाली आहे. याचा मोठा फटका साखर कारखान्यांना बसला आहे. सुरुवातीच्या काळात ऊस दरासाठी आंदोलने झाली. यामुळे पंधरा दिवस हंगाम सुरू होऊनही ऊसतोड केली नव्हती. नंतर हंगामाने गती घेतली. आता काही कारखाने बंद झाले असून हंगाम अंतिम टप्प्यात आहे.

















