नंदुरबार : खानदेशात चार साखर कारखाने सुरू आहेत. त्यात नंदुरबारात तीन कारखाने आहेत. धुळ्यात एक लहान कारखाना किंवा गुऱ्हाळ सुरू असून, तेथेही रोज ६०० ते ७०० टन ऊस गाळप केले जात आहे. आतापर्यंत सुमारे नऊ लाख टनांवर गाळप पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यात दोन खासगी व एक सहकारी साखर कारखाना सुरू आहे. दरवर्षी ऊस गाळप मार्च महिन्यात पूर्ण होते. परंतु यंदा गाळप उशिरा सुरू झाल्याने हंगाम महिनाभर लांबण्याची चिन्हे आहेत. एप्रिल अखेरीपर्यंत कारखाने सुरू राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदा गाळप काहीसे उशिरा सुरू झाले. गाळपास मागील महिन्यात गती आली आहे. खानदेशात सर्वाधिक टन ऊस गाळप समशेरपूर (ता.नंदुरबार) येथील खासगी कारखान्याने केले आहे. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील चहार्डी (ता.चोपडा) येथील कारखान्याने ऊस गाळप केले आहे. समशेरपूर येथील कारखान्याने यंदा १२ लाख टनांवर ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. तसेच चोपडा व मुक्ताईनगर येथील कारखान्यांनीदेखील गाळपास सुरुवातीपासून गती दिली आहे. नंदुरबारात नोव्हेंबर मध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. शहादा तालुक्यात अधिकचा पाऊस झाला. त्यामुळे या भागातील ऊस तोडणी अनेक दिवस बंद होती. डिसेंबरच्या मध्यानंतर ऊस तोडणीने वेग घेतला आहे. त्यामुळे हंगाम एप्रिलअखेर चालेल अशी शक्यता आहे.

















