सांगली : फळ महोत्सवात ‘शुगर फ्री’ केळी, गुळ कँडी ठरतेय नागरिकांचे आकर्षण

सांगली : महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात ‘द्राक्ष दिन’ साजरा केला जातो. या अनुषंगाने येथील कच्छी भवनमध्ये १४ ते १८ फेब्रुवारीदरम्यान सांगलीत फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे १५ प्रकारची द्राक्षही प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच शुगर फ्री केळींपासून ते बडिशेप गूळकँडीपर्यंत विविध उत्पादने उपलब्ध आहेत. सांगलीच्या पूर्व व उत्तर भागात द्राक्षांना पर्याय म्हणून ‘ब्ल्यू जावा’ केळीचे पीक घेतले जात आहे. भरपूर कॅलरीज व जीवनसत्त्वे असलेली ही ‘शुगर फ्री’ केळी महोत्सवात उपलब्ध आहेत. तसेच निर्जलीकरण केलेली फळे, फळभाज्या व पालेभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. शुगर फ्री केळी, बडिशेप, इलायची, आले व सुंठ यांचा समावेश करून तयार केलेली गुळ कँडी नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहे.

कृषी विभाग, राज्य द्राक्ष बागायतदार संघ, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा फळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून ताजी फळे व विविध उत्पादने खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. येथे सुमारे ५२ स्टॉल्स आहेत. सांगलीच्या द्राक्ष व बेदाण्याला चांगला दर मिळावा, यासाठी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. द्राक्षांसोबत विविध प्रकारचे बेदाणे उपलब्ध आहेत. उन्हात वाळवलेले बेदाणे, द्राक्षाचा ज्यूस, जॅम व लोणचे बिस्किटे, हळद, कच्च्या टोमॅटोपासून तयार केलेला सॉस यांचाही समावेश आहे. चिकू व आंब्याचे वाळवलेले काप हवाबंद डब्यांतून विक्रीसाठी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here