सोलापूर : नंदूर येथील आवताडे शुगर ॲण्ड डिस्टीलरीज् प्रा. लि. या कारखान्याने चालू गळीत हंगामात तब्बल ४ लाख ८ हजार ८९० मे. टन उसाचे गाळप केले. कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गळीत हंगामाची सांगता झाली. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, सरव्यवस्थापक सुधीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उत्पादित ४ लाख २५ हजार ५५५ साखर पोत्यांचे पूजन अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जिल्हाध्यक्ष ह. भ. प. पार्वतीताई आवताडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सुनीता पवार, अंजलीताई आवताडे, सुकेशिनी आवताडे, जि. प. सदस्य करूणा शिवशरण, नगरसेविका सावित्री कोंडूभैरी, प्रतीक्षा मेटकरी, विजया गुंगे, नीलाताई आटकळे, आशा नागणे उपस्थित होत्या.
कारखाना प्रशासनाने सरासरी १०.५० टक्के साखर उतारा साध्य केला. या हंगामात एकूण ४,२५,५५५ क्विंटल साखर उत्पादन करण्यात आल्याची माहिती चेअरमन संजय आवताडे यांनी दिली. शासनाने निश्चित केलेली एफआरपी २५०० रुपये प्रति मे. टन असताना कारखान्याने ३ हजार रुपये प्रति मे. टन एकरकमी दर देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा त्यांनी केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कारखान्यातील कर्मचाऱ्यांना दिवसांचा पगार बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश भांजे, हणमंत दुधाळ, प्रदीप खांडेकर, जनार्धन शिवशरण, पंचायत समिती सदस्य विनायक यादव, अर्जुन म्हल्लाळे, श्रीकांत गणपाटील, बाळासाहेब ताड तसेच नगरसेवक सोमनाथ हुशारे, अरुण गुंगे, बाबा कोंडूभैरी यांचाही गौरव करण्यात आला.


















