कोल्हापूर : पाऊण लाखाहून अधिक सभासद असलेला बिद्री साखर कारखाना हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील साखर उद्योगासाठी दिशादर्शक ठरत आहे. अत्याधुनिक मशिनरींनी सुसज्ज असलेला हा कारखाना सातत्याने उच्चांकी कार्यक्षमतेचा आदर्श निर्माण करत आहे, असे प्रतिपादन शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांनी केले. येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यास दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
जयंत पाटील यांनी कारखान्याच्या एकूण व्यवस्थापनाची सविस्तर माहिती घेतली. मुख्य साखर प्रकल्पासह सहवीज प्रकल्प व डिस्टिलरी प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, चार तालुक्यांतील ऊस उत्पादक सभासदांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी निर्माण करण्यात या कारखान्याने मोलाची भूमिका बजावली आहे. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई तसेच कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे व संबंधित अधिकारी यांनी उत्पादन क्षमता, ऊस गाळप नियोजन, सहवीज व डिस्टिलरी प्रकल्प, तसेच सभासद व शेतकरी हिताच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी संचालक आर. व्ही. पाटील, उमेश भोईटे, फिरोजखान पाटील, रणजित मुडुङ्कशिवाले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


















