लातूर : चांगल्या पावसामुळे निलंगा तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. यंदा उसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. परंतु कारखान्यांचा गाळप हंगाम उशिरा सुरू झाल्याने नोंद असलेल्या शेतकऱ्यांचाही ऊस दोन महिन्यांपर्यंत प्रलंबित राहत आहे. त्यामुळे कारखान्याच्या गट कार्यालयात शेतकरी खेटे घालत आहेत. तालुक्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत असून, काही ठिकाणी गेल्या १५ महिन्यांपासून ऊस शेतातच उभा आहे. कारखान्यांकडून वेळेवर तोड न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तालुक्यातील अंबुलगा सहकारी साखर कारखाना मोठ्या प्रमाणात गाळप करत असला तरी अतिरिक्त उसामुळे त्यांनाही अडचणी येत आहेत. काही शेतकरी हलगरा येथील हनुमान खांडसरी तसेच इतर खासगी कारखान्यांकडे ऊस देत आहेत.
गेल्यावर्षी व यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने मांजरा व तेरणा नदीपात्रात पाणी साठले आहे. बंधारे, मध्यम व लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने उसाचे उत्पादन वाढले. मात्र, साखर कारखान्यांना तोडणीचे नियोजन योग्य पद्धतीने करता आलेले नाही. मजूर टोळ्या उपलब्ध नसल्यामुळे कारखान्यांनी हार्वेस्टरद्वारे तोडणी केली जात असली तरी सर्वच ऊस वेळेत गाळपाला जात नाही. काही शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंद केली नसल्याने तसेच काही जण सभासद नसल्याने त्यांचा ऊस अधिकच रखडला आहे. उसाला तुरे फुटले आहेत. आता जिल्ह्याबाहेरील व कर्नाटकातील कारखान्यांनीही गाड्या पाठवून ऊस उचल सुरू केली आहे. मात्र वाहतूक खर्च व विलंबामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. फडाबाहेर ऊस काढण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला आला असून, जो कारखाना उपलब्ध होईल त्याठिकाणी ऊस घालण्याची वेळ आली आहे.


















