पुणे : यंदा गाळप हंगाम वेळेत सुरू झाला तरी खासगी कारखान्यांच्या वाढत्या संख्येमुळे ऊस मिळवण्यासाठीची स्पर्धा तीव्र झाली आहे. या स्पर्धेचा थेट फटका सहकारी कारखान्यांना बसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यांना कमी ऊस उपलब्ध झाला. त्यामुळे अनेक कारखान्यांचे गाळप उद्दिष्ट यंदा अपूर्ण राहण्याची दाट शक्यता आहे. शिवाय हंगामात उसाच्या सरासरी वजनात मोठी घट झाल्याने उत्तर पुणे जिल्ह्यातील साखर उद्योगाला अनपेक्षित फटका बसला आहे. पाऊस आणि हवामान बदलामुळे उसाचे एकरी उत्पादन घटल्याने भीमाशंकर आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्यांचे गाळप चालू महिना अखेरीस संपण्याची चिन्हे आहेत. उसाच्या घटत्या वजनाने साखर उद्योगासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
यंदा उसाचे सरासरी उत्पादन अवघे ४० ते ४२ टन प्रति एकर इतकेच भरत आहे. मागील वर्षी मे महिन्यापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे उसाच्या पिकावर विपरीत परिणाम झाला. शेतात उसाला मोठ्या प्रमाणात तुरे आले. त्यामुळे उसाची वाढ चांगली दिसत असली तरी प्रत्यक्षात त्यातील वजनावर परिणाम झाला. अपेक्षित प्रमाणात ऊस उपलब्ध होत नसल्याने कारखान्यांसमोर गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यंदा शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल कमी झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी खोडवा ऊस काढून टाकण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा थेट परिणाम पुढील वर्षीच्या गाळप हंगामावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. पुढील हंगामात चित्र सुधारण्यासाठी सुधारित ऊस वाणांचा अवलंब करणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापनावर भर देणे आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.

















