सांगली : वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी येथील उसाच्या शेतात लपलेल्या बिबट्यांच्या तीन बछड्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही आग विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागली, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वन विभागाने घटनास्थळी पोहचून माहिती घेतली आणि पुढील तपास सुरू केला आहे. शेतकरी अनिल तेरदाळे यांच्या ऊस शेतात वीज तारेतून निघालेल्या ठिणगीमुळे आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत उसाच्या शेतात लपलेली बिबट्याची तीन बछडी आगीत सापडली.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृत बछड्यांना ताब्यात घेतले. बुधवारी तीन बछड्यांचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वनरक्षक भिवा कोळेकर म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार ही आग विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे दिसते. शेतकरी तेरडाळे यांनीही आगीचे हेच कारण सांगितले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बछड्यांमध्ये दोन नर आणि एक मादी होती. त्यांची आई कदाचित बछड्यांच्या शोधात परिसरात भटकत असेल, म्हणून वन विभागाने आष्टा आणि फाळकेवाडी परिसरात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. वन विभागाने परिसरातील शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.


















