बेळगाव : शेतकऱ्यांची साखर कारखान्यांऐवजी गुऱ्हाळघरांना पसंती; सेंद्रिय गूळ निर्मितीला प्राधान्य

बेळगाव : वेदगंगा आणि दूधगंगा नदीकाठचा निपाणी तालुका ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. मुबलक पाणी, सुपीक जमीन यामुळे येथील शेतकऱ्यांनी बारमाही पिकांकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. विशेषतः ऊस पिकाला प्राधान्य दिले जात आहे. तसेच कारखान्यांना ऊस देण्याऐवजी काही शेतकरी स्वतः गुऱ्हाळ घरे उभारून गूळ निर्मितीच करत आहेत.

याबाबत दैनिक ‘पुढारी’शी बोलताना कुर्ली येथील गूळ उत्पादक रघुनाथ यादव म्हणाले कि, कारखान्यांना ऊस देण्यापेक्षा गूळ उत्पादनातून ३० टक्क्यांपर्यंत अधिक नफा मिळतो. मेहनत आणि नियोजन आवश्यक असले तरी स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होते. निपाणी तालुक्यात सध्या सात गुऱ्हाळघरे असून प्रत्येक गुऱ्हाळघरासाठी सुमारे ३२ मजुरांची गरज भासते. हंगाम साधारण तीन महिने चालतो.

सध्या गुळाला प्रतिकिलो सुमारे ४५ रुपये, तर सेंद्रिय गुळाला सुमारे १३० रुपये दर मिळतो. सेंद्रिय गुळाची मागणी वाढत असल्याने काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड करून प्रक्रिया उद्योगाला चालना देत आहेत. उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याची सोयही यामुळे होते. पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास निपाणी भागातील गुन्हाळ उद्योग अधिक बळकट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देऊ शकतो, असा विश्वास व्यक्त होत आहे.

सध्या उसाला प्रतिटन ३१०० ते ३२०० रुपये दर कारखान्याकडून मिळत आहे. मात्र दोन टन उसावर प्रक्रिया केल्यास सुमारे २६० किलो गूळ तयार होतो. एका आदनासाठी सुमारे ३ हजार रुपये खर्च येतो. गाळप मजुरी, औषधे, क्रशर मजुरी आणि डिझेल खर्च धरून हा अंदाज आहे. दोन टन उसापासून मिळणाऱ्या गुळाची किंमत सुमारे ११ हजार ७०० रुपयांपर्यंत जाते. खर्च वजा जाता अधिक नफा उरतो, असा शेतकऱ्यांचा दावा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here