सोलापूर : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये तीन लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण करत ३,००,५६४ क्विंटल साखर उत्पादन घेतले. कारखान्याने डिसेंबर २०२५ अखेर प्रतिमेट्रिक टन २८५० प्रमाणे ऊसबिल अदा केली असून, ऊस तोडणी-वाहतूक बिलेही १५ जानेवारीपर्यंत देण्यात आली आहेत. पुढील हंगामात मशिनरी सुधारणा करून गाळप क्षमता वाढविण्याचा विश्वास संचालक राजेंद्र पाटील यांनी गळीत हंगाम समाप्ती कार्यक्रीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केला. कारखान्याचा ३३ वा गळीत हंगाम सांगता समारंभ चेअरमन शिवानंद पाटील यांच्या हस्ते व संचालक राजेंद्र चरणूकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी कारखान्याने मागील तीन वर्षांपासून एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याची परंपरा कायम असल्याचे संचालक राजेंद्र पाटील यांनी सांगितले. गळीत हंगाम समाप्तीप्रसंगी संचालक महादेव सखाराम लुगडे व लता लुगडे यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा पार पडली. यावेळी व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, दादासाहेब दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, अशोक केदार आदी उपस्थित होते. संचालक रेवणसिद्ध लिगाडे यांनी आभार मानले.


















