कोल्हापूर: गडहिंग्लज तालुक्यात साधारण दरवर्षी १२ हजार ५०० ते १३ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र असते. साधारणपणे सात से आठ लाख टनांपर्यंत उसाची उपलब्धता असते. यंदा तालुक्यातील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर (गोडसाखर) कारखान्याने जाहीर केलेले चार लाख टन गाळपाचे घेतलेले उद्दिष्ट या कारणांमुळे पूर्ण होऊ शकलेले नाही. कारखान्याने यंदा एक लाख ९२ हजार ५४३ टन उसावर गाळप केले आहे. गडहिंग्लज तालुक्यातून यंदा तब्बल पाच लाख टन ऊस बाहेरच्या कारखान्यांना गाळपासाठी गेला.
नूतनीकरण कामातील तांत्रिक अडचणी, प्रत्यक्ष गाळपावेळी नव्या-जुन्या मशिनरीमुळे होणारे ब्रेकडाऊन आणि रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे नेसरी भागातील ऊस येण्यातील अडचणी यास कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते. गोडसाखर कारखाना व्यवस्थापनाने चार टन उसाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून गाळप सुरू केले, परंतु नूतनीकरणाचे काम उशिरा पूर्ण झाले. डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष गाळप सुरू झाल्यानंतरसुद्धा वारंवार तांत्रिक अडचणीच्या आव्हानांना व्यवस्थापनाला सामोरे जावे लागले. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांनी कंटाळून इतर कारखान्यांना ऊस पाठवला. बाहेरच्या सहा ते सात कारखान्यांनी तालुक्यातील ऊस नेला. गोडसाखर पूर्ण क्षमतेने व ब्रेकडाऊन न होता चालला असता तर किमान उद्दिष्टाच्या जवळ पोहोचला असता. आता पुढील हंगामात चार लाख टनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापनाचा प्रयत्न राहणार आहे, असे सांगण्यात आले.


















