जालना : अंबड-घनसावंगी तालुक्यात १८ कारखाने सक्रीय, १० लाख मे. टन उसाचे गाळप

जालना : अंबड व घनसावंगी तालुक्यांत गोदावरी नदी व डावा कालवा हे पाण्याचे मुख्य स्रोत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होते. त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील १८ कारखाने, ५ गूळ युनिट्सनी या दोन्ही तालुक्यांतील सुमारे १० लाख मे. टन उसाची तोड केली आहे. मराठवाड्याबाहेरील कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी करून गाळप केला आहे. गेल्या शंभर दिवसांत सहा हार्वेस्टर व टोळ्यांच्या माध्यमातून विक्रमी उसाचे गाळप झाले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात अद्यापही १० लाख मे. टन ऊस गाळप बाकी असून, मार्चअखेरपर्यंत समर्थ सागर कारखाना सहा लाख मे. टन गाळप करेल. तर उर्वरित चार लाख मे. टन ऊस बाहेरील कारखाने नेतील.

अंबड व घनसावंगी तालुक्यातील समर्थ युनिट-१ची गाळप क्षमता ७५०० मेट्रिक टन तर सागर युनिट-२ ची क्षमता ३७०० मेट्रिक टन आहे. समृद्धी शुगर दररोज पाच हजार मेट्रिक टन तर ब्ल्यू सफायर १२०० मेट्रिक टन गाळप करतो. याशिवाय, नगर जिल्ह्यातील प्रवरा (संगमनेर), संत ज्ञानेश्वर (भेंडा), वृद्धेश्वर (पाथर्डी), स्वामी समर्थ (वरखेड), साईप्रसाद अॅग्रो (अहिल्यानगर), मुळा सहकारी साखर कारखाना (सोनई), दौंड शुगर (दौंड), पराग शुगर (शिरूर), बारामती अॅग्रो (कन्नड), घृष्णेश्वर (खुलताबाद), छत्रपती संभाजी कारखाना (चित्ते पिंपळगाव, छत्रपती संभाजीनगर), ओंकारेश्वर ग्रुप (भोकरदन), शरद सहकारी साखर कारखाना (पैठण), अंबालिका (अंबालिका, कर्जत), प्रसाद शुगर (बाभोळा), जय महेश (माजलगाव) हे कारखाने या तालुक्यांतून ऊस उचलतात. बाहेरील कारखान्यांनी २९०० ते ३१५० रुपये प्रती टनापर्यंत भाव दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here