पुणे : देशातील महत्त्वाच्या ऊस उत्पादक राज्यांमध्ये यंदा उसाचे उत्पादन कमी झाले आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्याचा समावेश आहे. त्यामुळे देशात साखर उत्पादन ३०९ लाख टन होण्याचा अंदाज ‘इस्मा’ या संस्थेने दिला असला तरी पाच मोठ्या व्यापारी संस्थांनी साखर उत्पादन २८५ ते २९० लाख टनांच्या दरम्यान राहील, असा अंदाज वर्तवला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर चढे राहण्याचा अंदाज आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी दर पातळी यामुळे साखर निर्यातीचा निम्माही कोटा पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत असेही रॉयटर्सने म्हटले आहे.
देशातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये ऊस पिकाला पावसाचा फटका बसला आहे. महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटकातील शेतकऱ्यांनी ऊस पिकाला अतिवृष्टीचा फटका बसल्याचे सांगितले. अतिवृष्टीमुळे मुळांची वाढ खुंटली आणि ऊस लवकर पक्व झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी साखर उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील उत्पादन १०० लाख टनापर्यंत स्थिरावण्याचा अंदाज आहे. यापूर्वी १०८ लाख टन उत्पादनाचा अंदाज होता. महाराष्ट्रात आतापर्यंत ९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. २०७ पैकी निम्म्या कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. केंद्र सरकारने २० लाख टन साखर निर्यातीचा कोटा दिलेला आहे. पण देशात सध्या आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा भाव चांगले आहेत. त्यामुळे निर्यातीकडे ओढा कमी असेल. परिणामी चालू हंगामातील साखर निर्यात सात लाख टनांवरच स्थिरावण्याची शक्यता आहे, अशी शक्यता आहे.


















