अहिल्यानगर : १० हजार मेट्रिक टनगाळप क्षमतेचा नवीन प्रकल्प अवघ्या सहा महिन्यांत उभारण्याचा आणि कमी कालावधीत गाळप हंगाम यशस्वी करण्याचा ऐतिहासिक विक्रम पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने करून दाखवला असल्याचे गौरवोद्वार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काढले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७६ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, चेअरमन नंदकुमार राठी, मकरंद गुणे, मच्छिद्र थेटे, नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह सर्व संचालक, सभासद, अधिकारी व कामगार उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले, अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढविली असल्याने उसासाठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्षेत्रात हक्काचा ऊस निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जलसंपदा विभागाची जबाबदारी आल्यानंतर मागील दीड वर्षात पाण्याचे नियोजन चांगल्या पद्धतीने झाले आहे. आवर्तन वेळेवर सुटल्याने टंचाई भासली नाही व जिल्ह्यातून पाणी बाहेर जाऊ दिले नाही. सर्व चारींची कामे सुरू झाली आहेत. प्रवरा कालव्याच्या नूतनीकरणासाठी १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळावे, हाच आपला प्रयत्न असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
म्हस्के म्हणाले की, कारखान्याने गाळप क्षमता वाढविण्याचा फायदा भविष्यात सर्वांना समजणार आहे. अतिशय वेळेत आणि विनाअडथळा कारखाना चालविल्याबद्दल सर्व संचालक व कामगारांचे त्यांनी अभिनंदन केले. चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, कारखान्याच्या प्रगतीमुळे परिसराच्या उज्ज्वल भविष्याची संधी आहे. नव्या प्रकल्पाचे पूर्ण झालेले काम आणि यशस्वी झालेला गळीत हंगाम हे सहकारी साखर कारखानदारीमध्ये निर्माण करण्यात आलेल्या यशाचे एक नवे उदाहरण असून त्याचा अभिमान वाटतो. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कारखान्याला मोठे सहकार्य मिळाले असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.


















