महाराष्ट्र : राज्यातील दहा जिल्ह्यांतील ऊसतोड कामगारांना शिधासंच, गृहोपयोगी वस्तूंचे होणार वितरण

सोलापूर : राज्यातील बहुतांश ऊसतोड कामगार हे विविध जिल्ह्यांत स्थलांतरीत होऊन काम करतात. त्यामुळे त्यांचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे असते. त्यामुळे राज्य शासनाने चार लाख ऊसतोड कामगारांना सण, उत्सवासाठी मोफत शिधासंच वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक बीड जिल्ह्यातील कामगारांचा समावेश आहे. बीडसह नाशिक, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जळगाव, जालना, अहिल्यानगर, परभणी या दहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून संपूर्ण वितरण प्रक्रियाची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

योजनेच्या पहिल्या टप्प्यात चार लाख नोंदणीकृत ऊसतोड कामगारांपैकी एक लाख कामगारांना हा शिधासंच मोफत दिला जाणार आहे. यापैकी सर्वाधिक २५ हजार लाभार्थी संख्या ही बीड जिल्ह्यातील कामगारांची आहे. शिधा संचामध्ये दोन किलो साखर, एक किलो खाद्यतेल, एक किलो चणा डाळ, एक किलो रवा, एक किलो मैदा, एक किलो पोहे अशा सुमारे ६१० रुपये किंमतीच्या खाद्यपदार्थांचा समावेश असणार आहे. ताट, वाट्या, पाण्याचे ग्लास, पातेले, मोठा चमचा, पाण्याचा जग, मसाला डब्बा, परात, प्रेशर कुकर, स्टीलची टाकी मोठी झाकणासह असा एकूण ३० भांडे समाविष्ट असलेला संच कामगारांना वितरीत करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार व त्यांचे कुटुंबिय दरवर्षी गळीत हंगामाच्या कालावधीमध्ये ६ महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी झोपड्यांमध्ये राहतात. त्यासाठी त्यांना या वस्तू दिल्या जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here