सांगली : यंदा जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला. हंगामाच्या सुरुवातीपासूनच काही कारखान्यांसमोर ऊस उपलब्धतेचा प्रश्न गंभीर होता. तरीही आतापर्यंत जिल्ह्यातील या साखर कारखान्यांनी चालू हंगामात तब्बल ७९ लाख टन ऊसाचे गाळप करून ८९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. आतापर्यंत सरासरी १०.५१ टक्के साखर उतारा नोंदवला गेला आहे. आतापर्यंत सहा कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. यामध्ये आरग (ता. मिरज) येथील मोहनराव शिंदे, चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक, राजेवाडी (ता. आटपाडी) येथील सदगुरु श्री श्री शुगर, वाटेगाव (ता. वाळवा) येथील राजारामबापू पाटील, नागेवाडी (ता. खानापूर) येथील भारती शुगर आणि कुंडलमधील क्रांती साखर कारखाना यांचा समावेश आहे.
उपलब्ध माहितीनुसार, उर्वरित १० कारखान्यांचा हंगाम पुढील आठवड्यात टप्प्याटप्प्याने बंद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी उताऱ्याच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राजारामबापू वाटेगाव (१२.५३ टक्के), राजारामबापू कारंदवाडी (१२.४८ टक्के), क्रांती (१२.२४ टक्के) आणि दत्त इंडिया (१२.२२ टक्के) यांनी १२ टक्क्यांहून अधिक साखर उतारा मिळवला. विश्वासराव नाईक (१२.१५ टक्के) व दालमिया भारत शुगर (११.८८ टक्के) यांनीही चांगली कामगिरी बजावली. पण, सोनहिरा (८.४३ टक्के), उदगिरी शुगर (८.४ टक्के) व रायगाव शुगर (८.८ टक्के) या कारखान्यांचा उतारा तुलनेने कमी राहिला. बहुतांश कारखान्यांनी गाळप क्षमता दुपटीहून अधिक वाढविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाची टंचाई निर्माण झाली होती. हंगामाच्या अखेरीस ऊस उपलब्धतेअभावी उत्पादनात घट झाल्याचे चित्र आहे.


















