पुणे : शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप झालेल्या सर्व उसाची बिले अदा केली आहेत. कारखान्याने हंगामातील पहिला हप्ता प्रति टन ३१०१ रुपये या प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारी (दि.२०) जमा केले आहेत. हंगामात गाळप झालेल्या सर्व उसाची बिले शेतकऱ्यांना अदा करणारा हा बहुधा पहिला कारखाना आहे, असा दावा कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.
भाग्यश्री पाटील यांनी सांगितले की, आगामी गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये विक्रमी गाळपासाठी कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आतापासूनच संचालक मंडळाने नियोजन सुरु केले आहे. चालू हंगाम हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. कारखान्याने ५,२५,६५७ मे. टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. हंगामामध्ये गाळप झालेल्या सर्व ऊस बिलाची रक्कम शुक्रवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. कारखान्याचे संस्थापक संस्थापक हर्षवर्धन पाटील, अध्यक्षा भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी शेतकरी, कामगारांचे अभिनंदन केले आहे.


















