छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील आठ कारखान्याच्या साखर उत्पादनात वाढ, आतापर्यंत २७ लाख क्विंटल साखर उत्पादन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऊस पट्ट्यातील कारखान्यांना स्थानिक उसाचा आधार मिळत असताना कन्नड, चित्तेपिंपळगाव व खुलताबाद येथील काही कारखान्यांना क्षेत्राबाहेरील उसावर अवलंबून राहावे लागत आहे. तरीही उत्पादन आणि उताऱ्यात समाधानकारक कामगिरी दिसून येत आहे. २० फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी एकूण २७ लाख १८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करत २७ लाख ३१ हजार १२० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. यंदाचा सरासरी साखर उतारा १०.०५ टक्के नोंदला असून, मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे सात लाख क्विंटलने उत्पादन वाढले आहे.

जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला आतापर्यंत ११२ दिवस पूर्ण झाला आहे. जिल्ह्यात मुक्तेश्वर शुगर मिल (सेंदूरवाडा), बारामती अॅग्रो (कन्नड), छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग (चित्ते पिंपळगाव), घृष्णेश्वर शुगर (खुलताबाद), पंचगंगा शुगर (महालगाव) हे खासगी, तर रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना (विहामांडवा), श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्त्वावर सचिन घायाळ शुगर (पैठण) आणि गंगापूर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर जय हिंद शुगर असे सहकारी कारखाने गाळप हंगामात कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here