कोल्हापूर: शाहूवाडी तालुक्यातील कोतोली, मालेवाडी, नेर्ले, भेडसगाव, पाटणे व कडवी येथे काही गुन्हाळघरे सुरू आहेत. मात्र, कोतोली येथील अरुणकुमार दौलू पाटील यांनी २० वर्षांची परंपरा जपत शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे बियाणे व आवश्यक खर्च देऊन ऊस शेतीस प्रोत्साहन दिले. यातून सेंद्रीय पद्धतीने ऊस उत्पादन केले जाते. या उसाला कऱ्हाड बाजारपेठेत ७,४०० रुपये क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. सेंद्रिय पद्धतीने ऊस शेती केल्यामुळे हा दर मिळाल्याचे सांगितले जात आहे. सध्या शिराळा तालुक्यात सुभाष पाटील यांचे एकमेव गुऱ्हाळ सुरू आहे. सेंद्रिय खतावर आधारित सेंद्रिय शेतीमुळे दर्जेदार ऊस उत्पादन होत असून त्याचा फायदा गुन्हाळघराला व उच्च प्रतीचा गूळ तयार होण्यास होतो.
अरुण पाटील यांनी गुऱ्हाळघरात स्वतःचा वजनकाटा बसविला आहे. काटामारी होत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस देतात. ते प्रतिटन ३ हजार ५०० रुपये विनाकपात दर देतात. तसेच प्रतिटन अर्धा किलो गूळ शेतकऱ्यांना देऊन ऊस खरेदी करतात. १० दिवसांत बिल अदा करण्याची पद्धत त्यांनी सुरू ठेवली आहे. येथील गुळ गेल्या २१ वर्षांपासून कऱ्हाड बाजारपेठेत पाठविला जातो. चालू हंगामात सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये दर मिळत असून उच्चांकी ७ हजार ४०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.


















