सातारा : अजिंक्यतारा कारखान्याच्या वजन काट्याची भरारी पथकाकडून तपासणी, काटा अचूक असल्याचे स्पष्ट

सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम मार्गदर्शक संचालक, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली दमदारपणे सुरू आहे. सातारा वैध मापनशास्त्र विभागाकडून कारखान्याच्या ऊस वजनकाट्याची तपासणी केली जाते. नुकतीच भरारी पथकाने कारखान्यास अचानकपणे भेट देऊन कारखान्यातील ऊस वजनकाट्यांची तपासणी केली. तपासणीदरम्यान हे सर्व ऊस वजनकाटे तंतोतंत व अचूक वजन दर्शवीत असल्याचे स्पष्ट झाले. भरारी पथकाने तसा अहवाल दिला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी दिली. कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी विलास पाटील, केनयार्ड सुपरवायझर प्रमोद कुमार व सर्व अधिकारी उपस्थित होते.

अनिता अटक व धनश्री तेलंगे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकामध्ये पोलिस निरीक्षक नीलेश तांबे, पुरवठा अधिकारी अतुल जिवणे आदींचा समावेश होता. भरारी पथकाने ४० टनी एक, ६० टनी दोन, तसेच ८० टनी एका वजनकाट्याची तपासणी केली. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये उसाने भरलेल्या वाहनांचे फेर वजन करून ते बरोबर असल्याची खात्री करून घेतली. वाहनामधील उसाचे वजन इलेक्ट्रॉनिक वे ब्रीज इंडिकेटरला तंतोतंत असल्याचे दिसून आले. याबाबत कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे व उपाध्यक्ष नामदेव सावंत यांनी सांगितले की, ऊस वजनकाटे तंतोतंत वजन दर्शवीत असल्याने ऊस वजनाबाबत ऊस उत्पादक सभासद, बिगर ऊस उत्पादक सभासद, शेतकऱ्यांचा कारखान्यावर पूर्णपणे विश्वास असल्याचे दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here