सांगली : जिल्ह्यात टेंभू, ताकारी, म्हैसाळ, अरफळ उपसा सिंचन योजनांमुळे जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढले आहे. पण, अनेक शेतकरी ऊस पीक परवडत नसल्यामुळे भाजीपाला, द्राक्ष, डाळिंबासह अन्य पिकांकडे वळले आहेत. जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र होते. २०२६ मध्ये सद्यःस्थितीला ९३ हजार २८२ हेक्टरपर्यंत उसाची लागवड झाली आहे. यामध्ये आणखी १० हजार हेक्टर वाढ झाली तरी मागील दोन वर्षाच्या तुलनेत जवळपास ३२ हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र घटण्याचा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. कारखान्यांची गाळप क्षमता वाढली असली तरी जिल्ह्यातील घटते उसाचे क्षेत्र भविष्यात साखर कारखान्यांसाठी आर्थिक संकट ठरणार आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांची २००२ मध्ये प्रतिदिन ३५,००० ते ४०,००० टन ऊस गाळपाची क्षमता होती. यामध्ये दरवर्षी वाढ होऊन १६ कारखान्यांची गाळप क्षमता ८५,००० टन प्रतिदिन झाली आहे. कारखान्यांची गाळप क्षमता वाढत असताना उसाचे क्षेत्र घटत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी तासगांव, कवठेमहांकाळ आणि आटपाडी हे तीन कारखाने बंद आहेत. उर्वरित १६ कारखान्यांची गाळपक्षमता ८५ हजार टन प्रतिदिन आहे. गळीत हंगामात १०० लाख टन गाळप करण्याची क्षमता या कारखान्यांची आहे. मात्र, पूर्वी गाळप हंगाम एप्रिल अखेरपर्यंत चालत असे. साधारणतः १८० ते २०० दिवसांवरून तो आता फक्त १०० दिवसांवर आला आहे. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. कारखान्यांचा खर्च वाढत आहे. सध्या किमान १५० दिवस तरी कारखाना चालू राहिला पाहिजे, यासाठी व्यापक संशोधन आवश्यक आहे, असे राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी सांगितले.

















