अहिल्यानगर : मुळा सहकारी साखर कारखान्याने यंदा अवघ्या ११५ दिवसांत नऊ लाख ३० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. आधुनिक यंत्रसामग्री व गाळप क्षमता वाढविण्यात आल्याने दररोज साडेनऊ ते दहा हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले, अशी माहिती माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली. मुळा साखर कारखान्याच्या ४८ व्या गळीत हंगाम सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. बाळकृष्ण महाराज सुडके, सीताराम झिने, नानासाहेब रेपाळे, काकासाहेब गायके, संजय सुखदान, मुळा बँकेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब निमसे, प्रगतिशील शेतकरी भाऊसाहेब लांडे, महादेव दराडे उपस्थित होते. पुढील वर्षी १५ लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची घोषणा त्यांनी केली.
या कार्यक्रमात नानासाहेब तुवर, स्थापत्य अभियंता दीपक नवले व शेतकी अधिकारी विजय फाटके यांच्या हस्ते सपत्नीक गव्हाणीचे पूजन करण्यात आले. माजी मंत्री गडाख व मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आली. हंगामात विक्रमी ऊसतोड व वाहतूक केलेल्या भीमराव चव्हाण, दिलीप पोटे, दादा धनगर, माणिक हाके, शिवाजी राठोड, आदिनाथ दहिफळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांसह अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. बेल्हेकर यांनी गळीत हंगामाचा आढावा घेतला. अध्यक्ष नानासाहेब तुवर, बाळासाहेब सोनवणे, आश्रू सानप, जालिंदर येळवंडे व अरुण सावंत यांची भाषण झाले. सचिव रितेश टेमक यांनी सूत्रसंचालन केले. वसंतराव भोर यांनी आभार मानले.
















