सोलापूर : ऊसबिलासाठी आज ‘स्वाभिमानी’चे आंदोलन, साखर सहसंचालक कार्यालयासमोर मांडणार ठिय्या

सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे यंदाच्या हंगामातील थकीत असलेल्या ऊसबिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शुक्रवारी (ता. २७) सोलापुरातील साखर सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली. जिल्ह्यातील चालू वर्षीचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला तरीही अनेक कारखान्यांनी १५ नोव्हेंबरपासूनची तर काही कारखान्यांनी १ डिसेंबरपासूनची ऊसबिले अजूनही जमा केली नाहीत. जिल्ह्यातील २२ कारखान्यांकडे १५ फेब्रुवारीपर्यंत देय असलेली ४९६ कोटी एफआरपी थकली आहे. दुसरीकडे कारखान्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यानुसारची ३० कारखान्यांकडे या कालावधीतील थकीत ऊसबिलाची रक्कम ९५० कोटींच्या घरात आहे.

ऊसदर नियंत्रण कायदा १९६६ नुसार ऊस गाळप झाल्यापासून १४ दिवसांच्या आता ऊसबिले जमा करणे बंधनकारक आहे. असे असताना जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस गाळप करून तीन महिने झाले तरीही शेतकऱ्यांची बिले जमा करण्यात केलेली नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत सापडले आहेत. तरी साखर सहसंचालकांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना ऊसबिले देण्यास भाग पाडावे, या मागणीसाठी आंदोलन येणार आहे. दरम्यान, माळशिरसचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर म्हणाले, ऊसबिले थकीत असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. ऊसबिले प्रलंबित असलेल्या संबंधित शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाऊ देणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here