परभणी : राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढविल्यानंतर उसासाठीची स्पर्धा शिगेला पोहोचली आहे. यंदाच्या गळीत हंगामात तब्बल २० हून अधिक बाहेरील जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पाथरी तालुक्यात ठाण मांडून उसाची खरेदी केली. मागील दोन महिन्यांत दररोज सरासरी २५ हजार टनांपेक्षा अधिक ऊस बाहेरील जिल्ह्यात गाळपास गेल्याची स्थिती असून, परिणामी स्थानिक कारखान्यांना फेब्रुवारीतच हंगाम आटोपण्याची वेळ आली आहे.
गोदावरी नदीकाठचा पाथरी तालुका हा बारमाही पाण्यामुळे उसासाठी पोषक मानला जातो. दरवर्षी गोदावरी नदीकाठावर उसाचे क्षेत्र वाढत आहे. यंदा तालुक्यात सुमारे १३ हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत जवळपास २० कारखान्यांचे ट्रक, ट्रॅक्टर, हार्वेस्टर या भागात दाखल झाले होते. एक हार्वेस्टर आणि त्या पाठीमागे दहा ट्रक असा लवाजमा घेऊन कारखाने या भागात उसासाठी दाखल झाले होते. २०० ते २५० किमी अंतरावर या भागातील ऊस गाळपास नेण्यात आला.
बारामती अॅग्रोसह इतर ६ जिल्ह्यांतील कारखान्यांची वाहने पाथरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दिसली. दरस्पर्धेमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला,मात्र स्थानिक कारखान्यांसाठी ही परिस्थिती डोकेदुखीची ठरली. पाथरी तालुक्यात दोन खासगी साखर कारखाने एक पाथरी येथे तर दुसरा लिंबा येथे कार्यरत आहेत.पाथरी येथील प्रमुख कारखाना नोव्हेंबरमध्ये सुरू झाला. यंदा सर्वाधिक दर जाहीर करूनही अवघ्या चार महिन्यांत हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. २०२२ मध्ये या कारखान्याने मेअखेरपर्यंत गळीत हंगाम चालवत ३ लाख २५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. यावर्षी मात्र गाळपाचा आकडा २ लाख टनांवर आला आहे.


















