कोल्हापूर : कोल्हापूरच्या समृद्ध वारशाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांच्या विशेषतः कोल्हापुरी गूळ, चप्पल आणि चांदी उद्योगाची गुणवत्ता सुधारून त्यांच्या विक्रीत, निर्यातीत वाढ करण्यासाठी उद्योजक आणि औद्योगिक संघटनांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी केले.
चंदगड, शाहूवाडी आणि गगनबावडा यांसारख्या दुर्गम भागातील नाचणी, रताळे यांसारख्या स्थानिक उत्पादनांवर प्रक्रिया उद्योग निर्माण करून ती निर्यातक्षम बनविण्यासाठी विशेष पावले उचलली जावीत, असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील उद्योजक, निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेची कवाडे खुली व्हावी यासाठी जिल्हा उद्योगकेंद्रातर्फे शासकीय विश्रामगृह येथे आयोजित ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन २०२६’ कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी उद्योग सहसंचालक संदीप रोकडे, भारतीय पोस्ट सेवेचे वरिष्ठ अधीक्षक वैभव वाघमारे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश पवार, आयडीबीआय कॅपिटलचे मुकुंद तिवारी, डीजीएफटी सल्लागार अक्षय कोकणे, ‘कोल्हापूर फर्स्ट’चे सुरेंद्र जैन, आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, कमलकांत कुलकर्णी, जयदीप चौगुले, आय. ए. पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील, व्यवस्थापक विकास कुलकर्णी व बालाजी बिराजदार उपस्थित होते.
















