सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये १०० टक्के ऊस बिले अदा केली आहेत. कारखान्याने प्रती टन ३,००० रुपये या दराने ऊस बिले अदा केली आहेत. कारखान्याने त्रिस्तरीय करारानुसार, कामगारांनाही १० टक्के वेतनवाढ लागू केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी दिली. यावेळी व्हा. चेअरमन कैलास खुळे, संचालक व कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.
कर्मयोगी कारखान्याने जाहीर केलेली प्रती टन ३००० रुपये ऊस बिलापोटी २८२ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत. एफआरपीपेक्षा पूर्ण ऊस बिलाची रक्कम देणारा जिल्हातील हा पहिला कारखाना ठरला आहे. कामगारांनाही शासनाच्या वेतनवाढ कराराप्रमाणे १० टक्के पगारवाढीची रक्कमही डिसेंबर २०२५ पासूनच लागू केली आहे. कारखान्याने विना अडथळा गाळप केले असून दैनंदिन गाळपातील उच्चांक निर्माण केला अशी माहिती कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिले. ते म्हणाले की, कारखान्याने १०२ दिवसांत ९,४०,२२२ मे. टन ऊसाचे गाळप करून ८,५२,७९० क्विं. साखर उत्पादित केली आहे. हंगामात कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११ टक्के राहिला. कारखान्याने ६ कोटी युनिट वीज निर्मिती केली आहे. यावेळी संचालक दिनकरराव मोरे, उमेश चव्हाण, दिलीप परिचारक, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे आदी उपस्थित होते.


















