बीड : जयभवानी कारखान्याच्या हंगामाची सांगता, यंदा ५ लाख २४ हजार मेट्रिक टन ऊस गाळप

बीड: जयभवानी सहकारी साखर कारखान्याने गेल्या ५० वर्षांत मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. शिवाजीरावदादांनी पाहिलेले स्वप्न साकार होताना दिसून येत आहे. कारखान्याने गेल्या १११ दिवसांमध्ये ५ लाख २४ हजार ७८७ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. प्रती दिन ५००० ते ५५०० मे. टन गाळप करून ४,५३,१२० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. शेतकऱ्यांना प्रती टन २७७५ रुपये याप्रमाणे ऊस बिले बँक खात्यात जमा केली आहेत. डिस्टिलरीचे उत्पादन सुरू असून आजअखेर ४३ लाख ४५ हजार लिटर स्पिरीट उत्पादन झाले असून डिस्टिलरी मे अखेरपर्यंत चालू राहणार आहे, अशी माहिती कारखान्याचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब नाटकर यांनी दिली. कारखान्याच्या ४३ व्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते.

कुंभेजळगाव येथील श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे महंत दत्ता महाराज गिरी आणि जयभवानी कारखान्याचे व्हाईस चेअरमन नाटकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता झाली. यावेळी महंत हभप गुरुवर्य दत्ता महाराज गिरी यांनी आशीर्वादपर मनोगत व्यक्त केले. तोडणी, वाहतूक ठेकेदारांना प्रोत्साहनपर बक्षीस देवून सत्कार करण्यात आला. संचालक जगन्नाथराव शिंदे, श्रीराम आरगडे, कुमारराव ढाकणे, आप्पासाहेब गव्हाणे, नंदकुमार गोरडे, बाबूराव काकडे, गणपत नाटकर, नारायणराव नवले, संदिपान दातखीळ, कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here