महाराष्ट्र : राज्यातील सर्व साखर कारखान्यांवर शासकीय वजनकाटे बसवून ते ऑनलाइन करण्याची राजू शेट्टींची मागणी

कोल्हापूर : राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांमध्ये सर्रास काटामारी आणि साखर उतारा चोरी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे. चालू गळीत हंगामात तर सरासरी एकूण गाळप झालेल्या उसाच्या १० ते १५ टक्के वजनात घट आलेली आहे. काटामारीसह रिकव्हरी चोरीचे प्रमाण वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार व ऊसतोडणी मजूर दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व साखर कारखान्यांवर शासकीय वजनकाटे बसवून ते ऑनलाइन करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. राज्याच्या साखर आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाची पुढील गळीत हंगामापासून अंमलबजावणी करावी या मागणीचे निवेदन त्यांनी वैधमापन विभागाचे नियंत्रक चंद्रकांत डांगे यांना दिले.

राज्यातील प्रत्येक साखर कारखान्यामध्ये राज्य सरकारचे स्वतंत्र वजनकाटे बसवले जातील. हे वजनकाटे डिजिटल व ऑनलाईन प्रणालीने शासनाच्या मुख्य सर्व्हरला जोडण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. या अनुषंगाने राजू शेट्टी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व साखर कारखान्यांबाहेर संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, वजन मापे नियंत्रक यांच्या नियंत्रणात वजनकाटा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने वजनकाटे उभे करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शासनाकडे पैसे उपलब्ध नसतील तर संबंधित कारखान्यांच्या गाळप झालेल्या उसातून वजन काट्याच्या खर्चाची रक्कम शेतकऱ्यांकडून प्रतिटनाप्रमाणे समान कपात करून घेण्याची तरतूद करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here