अलिबाग (महाराष्ट्र) : शेतीमध्ये कृषी विभागाकडून वेगवेगळे प्रयोग होत असले तरी रायगड जिल्ह्यात भात शेतीचे क्षेत्र मात्र दिवसेंदिवस घटत आहे. गेली चार वर्ष भाताचे उत्पादन प्रति हेक्टर 2800 किलोग्रॅम होत होते, मात्र यंदा यात मोठी घट झाली असून प्रति हेक्टर 2081.32 किलोग्रॅम उत्पन्न मिळाले आहे. जिल्ह्यात महाड, रोहा, पाताळ गंगा, रसायनी, खोपोली, खालापूर, माणगाव, अलिबाग, तळोजा याठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र विकसित झाले आहे. जिल्ह्यात मुंबई गोवा, मुंबई पुणे महामार्ग, माणगाव दिल्ली कॉरिडॉर, निजामपूर दिघी, माणगाव दिघी हे महामार्ग झाले आहेत. या महामार्गांमध्ये हजारो हेक्टर जमीन गेली झाली आहे.
जिल्ह्यात पूर्वी 1 लाख 24 हजार हेक्टर शेती लागवडीखालील क्षेत्र होते. 2018-19 पर्यंत हे घटून 1 लाख 11 हजार हेक्टर पर्यंत खाली आले होते. गेल्या पाच वर्षांत यात अजून मोठी घट झाल्याचे दिसून येते आहे. यंदा 83 हजार हेक्टरवर भात लागवड करण्यात आलेली होती. जिल्ह्यात शेतजमिनीपैकी केवळ 7 हजार 165 हेक्टर सिंचनाखाली आहे. यातील 2 हजार 988 हेक्टर क्षेत्र हे विहीरींच्या पाण्यावर सिंचित केले जाते. तर 4 हजार 177 हेक्टर क्षेत्र हे धरणे, कालवे आणि इतर साधनांनी सिंचित केले जाते. त्यामुळे बहुतांश शेती ही खरीपाच्या लागवडीवर अवलंबून आहे. सिंचन सुविधांचा अभावही उत्पादन घटण्यास कारणीभूत ठरत आहे.















