अहिल्यानगर : कर्मवीर शंकरराव काळे आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी गेल्या सत्तर वर्षांत तालुक्यातील सहकारी साखर कारखानदारी अविरतपणे चालविली. तिस-या पिढीचे प्रतिनिधी, या नात्याने आता ही परंपरा पुढे चालविण्याची जबाबदारी आमची आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने यंदा सहा लाख पासष्ट हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून सात लाख एकोणसाठ हजार साखर पोत्यांचे उत्पादन केले. जिल्ह्यात सर्वाधिक ११.४१ टक्के साखर उतारा मिळवून काळे कारखान्याने जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी केली, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केले. कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात सभासद, कामगार व ऊस उत्पादकांसोबत संवाद साधताना ते बोलत होते. कारखान्याचे मार्गदर्शक, माजी आमदार अशोक काळे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे आणि त्यांच्या पत्नी गौरी यांच्या हस्ते पूजाविधी संपन्न झाला.
काळे म्हणाले की, यंदा ब-याच कारखान्यांचे गळीत हंगाम लवकर आटोपले. काळे कारखान्याचा हंगाम ११३ दिवस चालला. आधुनिकीकरणाचे दोन्ही टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने उत्तम साखर उतारा मिळाला. हे कामगार, संचालक मंडळ आणि अधिका यांच्या संयुक्त प्रयत्नांचे यश आहे. सभासद आणि उत्पादकांच्या तीन पिढ्यांचा विश्वास या कारखान्यावर आहे. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी आयुष्यभर सभासद, ऊस उत्पादक आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य दिले. हा वारसा आपण पुढे चालवीत आहोत. कारखान्याची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. तालुक्यातील अन्य खासगी कारखाने केंव्हाच बंद पडले. मात्र गेल्या सत्तर वर्षांपासून हे दोन्ही सहकारी साखर कारखाने अविरतपणे सुरू आहेत.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले. यावेळी कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संदीप शिरसाठ, डिस्टिलरीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, संचालक दिलीपराव बोरनारे, सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, प्रवीण शिंदे, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, वत्सलाबाई जाधव, इंदूबाई शिंदे, दिनार कुदळे, प्रशांत घुले, गंगाधर औताडे, श्रावण आसने आदी उपस्थित होते. आभार सूर्यभान कोळपे यांनी मानले.

















