सातारा: सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या ५२ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ नुकताच झाला. माजी मंत्री, सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सहकारच आमची ताकद असून सभासदांनी साथ दिली, तर सह्याद्री राज्यात नवा विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. सह्याद्री कारखान्याने यंदा ११३ दिवसांच्या गळीत हंगामात आठ लाख ६८ हजार ८३० मेट्रिक टन ऊस गाळप केले. सरासरी १२.६० टक्के साखर उताऱ्याने नऊ लाख ७१ हजार क्विंटल साखर पोती उत्पादन घेतले. कारखान्याने शेवटच्या टप्प्यात प्रतिदिनी ११ हजार ३०० मेट्रिक टन इतके विक्रमी उसाचे गाळप केले. आतापर्यंत कारखान्याने एक कोटी बारा लाख लिटर इथेनॉल उत्पादन घेतले असून आणखी ४० लाख लिटर उत्पादन शक्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गळीत हंगाम सांगता प्रसंगी संचालक संभाजीराव साळवे, त्यांच्या पत्नी जयश्री यांच्या हस्ते व अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष कांतिलाल पाटील व संचालकांच्या उपस्थितीत सत्यनारायण महापूजा झाली. (स्व.) पी. डी. पाटील यांनी सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रतिदिनी दहा हजार मेट्रिक टन ऊस गाळप क्षमतेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे पाहिलेले स्वप्न बाळासाहेब पाटील यांच्या परिश्रमाने व सभासद शेतकऱ्यांच्या एकजुटीने पूर्णत्वास आले अशी भावना व्यक्त करण्यात आली. हंगामात ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर गाडी, बैलगाडी आणि ऊस तोडणी मशिन यांचे प्रथम तीन क्रमांकाच्या मानकऱ्यांना रोख रकमेचे बक्षीस देऊन सन्मानित केले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी संचालक, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, नागरिक उपस्थित होते.


















