कर्नाटकातील अलंद तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस शेतकऱ्यांनी एआय आधारित शेती पद्धतीचा अवलंब केल्यामुळे उत्पादनात जवळपास दुपटीने वाढ मिळवली, असे सांगण्यात आले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकरी आता शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा प्रभावीपणे वापर करत आहेत. शेती क्षेत्रात पीक उत्पादकता वाढवण्यासाठी एआय हे महत्त्वाचे साधन ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अलंदच्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच सिंचन आणि पोषक तत्त्वांचा वापर अचूकपणे आणि कार्यक्षम करण्यासाठी सेन्सर्स आणि एआय विश्लेषणाचा आधार घेतला. त्यामुळे पाणी व खत व्यवस्थापनात सुधारणा होऊन उत्पादन खर्चात ३० ते ४० टक्क्यांनी बचत होत असल्याचे निष्पन्न झाले. अलंदमधील काही शेतकऱ्यांनी एआय विश्लेषणासह ठिबक सिंचनाच्या वापराद्वारे ४० टक्के उत्पादन वाढ मिळवली. तसेच पाणी आणि खतांची लक्षणीय बचत झाल्याची नोंद केली आहे.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी नुकत्याच झालेल्या एआय ४ अॅग्री समिटमध्ये भारतीय शेतीसमोरील दीर्घकालीन आव्हानांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कसा उपाय काढू शकते, याबाबत भूमिका मांडली. अनियमित हवामान, माहितीतील तफावत आणि विस्कळीत बाजार व्यवस्था ही शेतीसमोरील प्रमुख समस्या असल्याचे त्यांनी नमूद केले. पण एआयच्या मदतीने त्यावर प्रभावी तोडगा काढला जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. त्यांनी भारतजेन ‘अॅग्री परम’ मॉडेलसारख्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. हे मॉडेल २२ भारतीय भाषांमध्ये सल्ला सेवा पुरवते. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांसाठी एआय अधिक सुलभ होताना दिसत आहे. डॉ. सिंह यांनी ड्रोन, उपग्रह नकाशे आणि हवामान बुद्धिमत्ता यांचे एकत्रीकरण करून माती आरोग्याचे निरीक्षण अधिक सक्षम कसे करता येईल, याबाबत माहिती दिली.


















