महाराष्ट्र : वजनकाटे ऑनलाइन करण्याबाबतच्या सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची राजू शेट्टींची मागणी

मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांमध्ये सर्रास काटामारी व रिकव्हरी चोरी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे. चालू गळीत हंगामात तर एकूण गाळप झालेल्या उसाच्या १० ते १५ टक्के वजनात फरक येतो. त्यामुळे राज्यातील सर्व साखर कारखान्यांत शासकीय वजनकाटे बसवून ते ऑनलाइन करण्यासंदर्भात राज्याच्या साखर आयुक्तांनी काढलेल्या आदेशाची पुढील गळीत हंगामापासून अंमलबजावणी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे. याबाबत राज्याच्या वैधमापन विभागाचे नियंत्रक चंद्रकांत डांगे यांना निवेदन देण्यात आली.

याबाबत शेट्टी यांनी म्हटले आहे की, वजनकाटे उभा करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, याकरिता आमदार – खासदार स्थानिक विकास कार्यक्रम, जिल्हा नियोजन नावीन्यपूर्ण निधी किंवा शासनाकडे पैसे उपलब्ध नसतील, तर संबंधित कारखान्याच्या गाळप झालेल्या उसाच्या उत्पन्नातून वजनकाट्याच्या खर्चाची रक्कम शेतकऱ्यांकडून प्रति टनाप्रमाणे समान कपात करून घेण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ‘एआय’चा वापर करून या काट्यांचे मॉनिटरिंग करावे, असा आग्रहदेखील त्यांनी धरला. प्रत्येक साखर कारखान्यामध्ये राज्य सरकारचे स्वतंत्र वजनकाटे बसविले व हे वजनकाटे डिजिटल व ऑनलाईन प्रणालीने शासनाच्या मुख्य सर्व्हरला जोडण्याची प्रक्रिया झाली तर अधिक पारदर्शकता येईल. उसाचे वजन कल्यावर त्याचा मेसेज थेट संबंधित शेतकऱ्यांना दिला जाईल अशी व्यवस्था व्हावी, असेही या पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here