पुणे : येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामामध्ये आठ लाख ८३ हजार ६९ टन ऊस गाळप करून नऊ लाख २७ हजार १९७ साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याने हंगामात १५ फेब्रुवारी अखेर गाळप केलेल्या उसासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे ३,२७३ रुपये प्रतिटनाप्रमाणे एकूण २८० कोटी रुपये अदा केले आहेत. हंगामाची यशस्वी सांगता केली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. कारखान्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतील सुविधांचा लाभ घेवून ऊस लागवडीवर व उत्पादन वाढीवर भर द्यावा, असे आवाहन बेंडे यांनी केले.
याबाबत अध्यक्ष बेंडे म्हणाले की, कारखान्यामार्फत दत्तात्रेय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२० ही महत्वकांक्षी योजना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाते. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण, माती व पाणी परीक्षण सुविधा, उधारीवर ताग व ऊस बेणे वाटप, ऊस रोपवाटिका, खासगी ऊस लागवड व ठिबक सिंचन अर्थसहाय्य, द्रवरूप जिवाणू खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैव संजीवक, ह्युमिक अॅसिड, इपीएन, रासायनिक खते व औषधे, पाचट कुट्टी आदी पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांमार्फत ऊस पिकाबाबत अद्ययावत माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाते. कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्याने हंगाम यशस्वी झाला. यावेळी हंगाम यशस्वी करण्यासाठी योगदान देणारे ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार आणि मजुरांचा कारखान्याच्यावतीने सत्कार करण्यात आला.

















