सोलापूर : इराण युद्धाचा भडका उडाल्याने केळी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना तोड थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत. करमाळा तालुक्यात १० हजार एकर क्षेत्रात तब्बल तोडणीलायक १५ हजार मे. टन केळीचे उभे पीक आहे. निर्यातदारांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये तब्बल एक हजार मे.टन केळी सध्या शिल्लक आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांनी पुढील सूचना येईपर्यंत माल पाठवू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असे असले तरी केळी वेळेत पोहोचली नाही, तर व्यापाऱ्यासोबत उत्पादकांनाही मोठा फटका बसणार आहे. कारण निर्यातीच्या दरात व स्थानिक खरेदीच्या दरात मोठी तफावत आहे. केळीच्या निर्यातीचा दर १८ ते २५ रुपये प्रति किलो तर स्थानिक बाजारातील दर १३ ते १४ रुपये प्रति किलो आहे.
करमाळा तालुक्यात निर्यातक्षम एक हजार मेट्रिक टन केळी निर्यातदारांकडे शिल्लक असून जोपर्यंत शांततेची परस्थिती निर्माण होत नाही. तोपर्यंत निर्यातदार व शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी व करमाळा तालुक्यातील कंदर येथील निर्यात केंद्राकडून पाठविलेली ३०० कंटेनर केळी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जेएनपीटी बंदरात युद्धामुळे अडकली आहेत. इराण हा केळीचा सर्वांत मोठा आयातदार देश आहे. आठ ते दहा दिवसांत केळीची निर्यात सुरू झाली नाही तर केळी उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे.














