अहिल्यानगर: लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गेल्या १२१ दिवसांत १० लाख तीन हजार ३७० मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला. कारखान्याने नऊ लाख ३४ हजार ९०० साखरपोत्यांची निर्मिती केली आहे. दिवसाला सरासरी आठ हजार २९२ टनाप्रमाणे गाळप झाले. कार्यक्षेत्रात खासगी साखर कारखान्यांची वाढलेली संख्या असताना, ऊस पळवापळवीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या गळीत हंगामात चांगली कामगिरी केली. कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांच्या उपस्थितीत आज, गुरुवारी गळीत हंगामाची सांगता करण्यात येत आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी सांगितले की, कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली उसाची कमतरता असतानाही अधिकारी, कामगारांनी योग्य नियोजन करून यंदाच्या हंगामातील गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले. कारखान्याने ३१.५ मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पातून सहा कोटी ४२ लाख १५ हजार ८६० युनिट वीज निर्मिती केली. यातील चार कोटी युनिट वीज निर्यात केली. तर १,१०,०१,४७२ लीटर इथेनॉल निर्मिती झाली आहे. गेल्यावर्षी कारखान्याने कमी ऊस उपलब्ध असल्याने १०५ दिवसांत ८,११,५८० मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. यंदाच्या कारखान्याच्या ५२ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभाला अध्यक्ष नरेंद्र घुले यांच्यासह जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग आदी उपस्थित राहाणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक अनिल शेवाळे व सरव्यवस्थापक रवींद्र मोटे यांनी दिली.


















