सोलापूर: कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के ऊस बिल अदा केले आहे. कारखान्याने २,८५३ रुपये एफआरपी असताना त्यापेक्षा अधिक दर दिला आहे. प्रती टन ३,००० रुपये दराने २८२ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली. यावेळी व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व संचालक उपस्थित होते. कारखान्यातील कामगारांनाही शासनाच्या वेतनवाढ करारानुसार १० टक्के पगारवाढ डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहे अशी घोषणा त्यांनी केली.
कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, कारखान्याने वीज निर्मितीमध्ये व आसवनी प्रकल्पातही चांगली कामगिरी केली आहे. को-जनरेशन प्रकल्पातून ६ कोटी युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे. त्यापैकी ३.०४ कोटी युनिट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळास विक्री करण्यात आली आहे. आसवनी प्रकल्पातून १.१० कोटी लिटर उत्पादन घेण्यात आले असून दोन्ही प्रकल्प सध्या सुरू आहेत. कारखान्याने १०२ दिवसाच्या गाळप हंगामात ९ लाख ४० हजार २२२ मे. टन उसाचे गाळप केले. त्यापासून ८ लाख ५२ हजार ७९० क्विंटल साखर उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा ११ टक्के राहिला आहे.

















