सांगली : जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला आहे. यापैकी काही कारखान्यांनी ३१ डिसेंबर, १५ जानेवारीपासून गाळपाला गेलेल्या उसाची बिले दिलेली नाहीत. बिले लांबल्याने ऊस उत्पादक अडचणीत आले आहेत. मार्चअखेर असल्याने बँका, पतसंस्था, सोसायट्यांनी शेतकऱ्यांना पैशासाठी तगादा लावला आहे. मात्र, बिले नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सध्या खोडवा, सुरूचा ऊस कुळवण्याची सुरूवात झाली आहे. एकरी रासायनिक खतांची मात्रा २० हजार रुपयांच्या घरात जात आहे. शेत नांगरणे, शेतीला गावखत देणे ही कामे पैशाअभावी खोळंबली आहेत. मार्च महिन्याच्या तोंडावर साखर कारखाऱ्यांची ऊस बिले लांबल्याने शेतकरी आता सावकारांचे उंबरे झिजवू लागले आहेत.
सद्यस्थितीत कारखाने बंद झाले तरी बिले नसल्याने शेतकऱ्यांत संताप आहे. गेल्या हंगामात जादा पावसाने ऊस उत्पादन घटले होते. यावर्षी सरासरी एवढा पाऊस झाला. मात्र अनेक दिवस ढगाळ वातावरण राहिल्याने उसाच्या वाढीला याचा फटका बसला. त्यामुळे आडसाली उसाचे उत्पादन एकरी १५ ते २० टनाने घटले. तर सुरू ऊस तसेच खोडव्याचे उत्पादनही घसरले आहे. गेल्या दोन वर्षांत घटलेल्या ऊस उत्पादनाने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले की, साखर कारखान्यांनी थकीत बिलावर १५ टक्के व्याज द्यावे, असा आदेश गेल्यावर्षी न्यायालयाने दिला आहे. या हंगामात राज्यातील ऊस उत्पादकांची ४ हजार ६०० कोटी रुपयांची एफआरपी थकली आहे. राज्याच्या अधिवेशनात कोणत्याही आमदारांनी याबाबद्दल ब्र काढलेला नाही.


















