पुणे: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, अनेक कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सध्या सोमेश्वर, माळेगाव आणि भीमा पाटस हे तीनच साखर कारखान्यांचा सध्या गाळप हंगाम सुरू असून, २० ते २५ मार्चच्या सुमारास हे तिन्ही कारखाने आपला गाळप हंगाम बंद करू शकतात. यंदा सोमेश्वर साखर कारखान्याने पहिली उचल एकरकमी ३३०० रुपये प्रतिटन जाहीर केली आहे. फेब्रुवारीमध्ये तोडल्या जाणाऱ्या उसासाठी टनाला १०० रुपये तर मार्चमध्ये तोडल्या जाणाऱ्या उसासाठी टनाला २०० रुपये अधिकचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे एक मार्चपासून ऊस तोडला गेल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात ३५०० रुपये प्रति टन या दराने पैसे वर्ग करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने या हंगामात १३.५ ते १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्याच्या गाळपात सोमेश्वर जिल्ह्यात तिसरा, तर राज्यात आठवा आहे. कारखान्याने आजपर्यंत ११ लाख ३५ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करून १३ लाख ३१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे, तसेच ११.७९ या जिल्ह्यातील सर्वाधिक साखर उतारा राखत आघाडी घेतली आहे. कारखान्याने हंगामाच्या सुरुवातीसच सोमेश्वरने १३.५ ते १४ लाख टन गाळप करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्याची पूर्तता होऊ शकेल असा विश्वास कारखान्याच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.


















