कोल्हापूर : साखर कारखान्यात कामगारांनी काम करताना वैयक्तिक व सार्वजनिक सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रत्येकाने हेल्मेट, हातमोजे, सेफ्टी शूज, गॉगल अशी सुरक्षा साधने नियमित वापरावीत. यंत्रसामग्रीजवळ काम करताना नियमांचे काटेकोर पालन करावे आणि कोणतीही तांत्रिक अडचण दिसल्यास तत्काळ वरिष्ठांना कळवावे असे आवाहन ओलम शुगर्सचे युनिट हेड एन. रवीश यांनी केले. राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथे साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अंतर्गत कर्मचाऱ्यांना विविध सुरक्षा मार्गदर्शन शिबिरावेळी ते बोलत होते. कारखान्यात शून्य अपघात ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सुरक्षित कामकाज करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
युनिट हेड एन. रवीश यांच्या हस्ते सुरक्षा ध्वज फडकवून सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एन. रवीश म्हणाले, की आग प्रतिबंधक यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, प्रथमोपचार पेटी याबाबत प्रत्येक कर्मचाऱ्याला माहिती असणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखणे, ओलसर किंवा निसरड्या जागी सावधगिरी बाळगणे आणि बेपर्वाई टाळणे यावरही भर द्यावा. यावेळी एचआर मॅनेजर महेश भोसले यांनी सांगितले की, आगामी काळात या सप्ताहादरम्यान विविध जनजागृती उपक्रम, प्रात्यक्षिके व मार्गदर्शन शिबिर याद्वारे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जाईल. व्यवस्थापक महेश भोसले, श्रीशैल एच., नरेंद्र रावत, संतोष गुरव यांच्यासह कामगार उपस्थित होते. गणपत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सतीश पाटील यांनी आभार मानले.


















