सातारा : साखर कारखान्यातील सुरक्षिततेबाबत ‘किसन वीर’मध्ये कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

सातारा : साखर कारखान्यांसह औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या जीवनात सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा भाग असून, किसन वीर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने दक्ष राहून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. औद्योगिक सुरक्षा सप्ताहाच्या स्वरूपाला सांघिक कामगिरीतून रूप दिल्यास कारखान्यामध्ये होणारे संभाव्य अपघात टाळता येतात, असे प्रतिपादन किसन वीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांन केले. कारखाना कार्यस्थळावर राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची सार्वजनिक शपथ देण्यात आली. रणवरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षेबाबत मार्गदर्शन करून खबरदारी घेण्याबाबत सूचित केले. एचआर अरविंद शिंगटे यांनी सुरक्षा सप्ताहाचा हेतू विशद करून कामगारांसाठी कायदे व नियम असले तरी त्यांच्यामध्ये जनजागृती होण्याची गरज आहे. त्यासाठी आयोजित राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने किंबहुना वर्षभर कारखान्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आणि संस्थेची सुरक्षा जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे सांगितले. कारखान्याचे सर्व खातेप्रमुख विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here