सोलापूर जिल्ह्यात ११०० कोटींची ऊसबिले थकली, आजच्या सुनावणीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांकडे यंदाच्या गाळप हंगामात त्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यानुसारची फेब्रुवारीअखेर देय असलेली सुमारे ११०७ कोटी रुपयांची ऊसबिले थकली आहेत. ऊसबिले मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यंदाचा गाळप हंगाम घेतलेल्या जिल्ह्यातील ३४ पैकी तीनच कारखान्यांनीच पहिल्या हप्त्यानुसार ऊस बिले दिल्याचे आकडेवारीवरून दिसते. उर्वरित ३१ कारखाने पहिल्या हप्त्यानुसार ऊसविले देण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते.

गाळप झालेल्या उसाचे बिल १४ दिवसांत शेतकऱ्यांना अदा करणे कायद्याने बंधनकारक आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात एक कोटी ५४ लाख १२ हजार ४११ मे. टन उसाचे गाळप झाले होते. त्यापोटी साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना तीन हजार ४७६ कोटीची बिले देण्यात आली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील थकीत ऊसबिले मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या आठवड्यात सोलापुरातील साखर सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) प्रकाश अष्टेकर म्हणाले कि, सोलापूर जिल्ह्यातील थकीत ऊस बिलासंदर्भात जानेवारी महिन्यातच कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. थकीत ऊस बिले कायदेशीर पद्धतीने वसूल करायची आहेत. त्याबाबतचे आरआरसीचे प्रस्ताव साखर आयुक्तांकडे पाठवले आहेत. त्यांच्या स्तरावर त्याविषयी सुनावणी सुरू आहेत. आज (१० मार्च) याबाबत सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here