पुणे: बारामती तालुक्यातील सांगवी येथील दोन शेतकऱ्यांवर किरकोळ कारणावरून १७ ऊसतोड मजुरांनी लोखंडी कोयता व दगडाने हल्ला करण्याचा प्रकार घडला. या घटनेत दोन शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. रणजित तेनसिंग तावरे व करण तेनसिंग तावरे अशी ऊसतोड मजुरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी शेतकऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी रणजित तावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सर्व १७ जणांविरोधात माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. ८) रात्री उशिरा घडली.
याबाबत माळेगाव पोलिसांनी सांगितले की, दुधाच्या डेअरीत घाण का करता, असे विचारल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला. सांगवी येथील गट नं. ४२९ या शेतातील दूध डेअरीजवळ रणजित आणि करण तावरे उभे होते. यावेळी संशयितांनी ‘आम्ही तुला काय चोर वाटतो काय? तुला आम्ही आता जिवंत सोडणार नाही, तुम्हाला आज खल्लास करून टाकतो’, असे म्हणून हातामध्ये आणलेल्या लोखंडी कोयत्याने व दगडाने मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी संशयितांनी दोघांच्या खिशातील रोख रक्कम ४,६०० रुपये व करण तावरे यांच्या बोटातील दीड तोळ्याची सोन्याची अंगठी काढून घेतली.
रणजित यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र आज्ञा बारेला (रा. मोडद, ता. भगवानपूर, जि. खरगोल, मध्य प्रदेश), डेबा भिमसिंग बारेला, गुंजी भिमसिंग बारेला, दिलीप ध्यानसिंग बारेला (तिघेही रा. पाडसा, ता. आंबळनेळ, जि. जळगाव), मुकेश रुमालसिंग बारेला, ईनेश रुमालसिंग बारेला (दोघे रा. लिंभीगुडी, ता. पारी, जि. वडवाणी, मध्य प्रदेश), डुबरसिंग शिवाजी बारेला (रा. उत्तमनगर, ता. चोपडा, जि. जळगाव) यांसह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी एका वाहनावरही दगडफेक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक तुषार भोर तपास करीत आहेत.


















