कोल्हापूर : आजरा साखर कारखाना गुढीपाडव्यादिवशी पुढील हंगामासाठी तोडणी-वाहतूक करार सुरू करणार

कोल्हापूर: गवसे येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला सन २०२५ – २६ हंगामात १०५ दिवसांत ३ लाख ६ हजार ८८० मे. टन उसाचे गाळप करून ३ लाख ६३ हजार २२५ क्विटल साखरेचे उत्पादन घेतले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली. आगामी २०२६-२७ चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळाकडून सक्षम तोडणी-यंत्रणा-वाहतूक उभारण्यासाठी गुढीपाडव्यादिवशी तोडणी-वाहतुकीचे करार करण्याचे काम सुरू केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष देसाई यांनी सांगितले की, कारखान्याने १ ते १५ जानेवारी २०२६ अखेर गाळप झालेल्या ४२ हजार ३७१ मे. टन उसाच्या बिलाची प्रतिटन ३,४०० रुपये याप्रमाणे विनाकपात होणारी १४ कोटी ४० लाख रुपये इतकी रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिवृष्टीमुळे निकृष्ट प्रतीचा बनलेला ऊस कारखान्याने जादा खर्च करून गळितास आणून शेतकऱ्यांची अडचण दूर केल्याचे देसाई यांनी सांगितले. उपाध्यक्ष सुभाष देसाई व संचालक उपस्थित होते. कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here