बेळगाव : चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात १० लाख ६० हजार टन उसाचे गाळप करून विक्रमी साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्याच्या गळीत हंगामाची नुकतीच यशस्वी सांगता झाली. यावेळी साखर कारखान्याच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात ऊस पुरवठा व ऊस तोडणी व गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभ आणि गाळप हंगाम समाप्ती समारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे संचालक भरतेश बनवणे यांनी सांगितले की, राज्यसभेचे माजी सदस्य व केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष, पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे, राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळ, नवी दिल्लीचे संचालक अमित कोरे व कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी हंगाम यशस्वी झाला आहे. कारखान्याचे सभासद, कर्मचारी, ऊस तोडणी कामगार व वाहतूकदार या सर्वांचे मोठे सहकार्य यासाठी लाभले आहे. यावेळी संचालक अजितराव देसाई, अण्णासाहेब पाटील, चेतन पाटील, मल्लाप्पा म्हैशाळे, अण्णासाहेब इंगळे, महावीर कात्राळे, भरमगौडा पाटील, व्यवस्थापकीय संचालक बी. आर. खंडगावी आदी उपस्थित होते.


















