सोलापूर : जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात सहभागी झालेल्या ३४ साखर कारखान्यांपैकी जवळपास २७ कारखान्यांकडे ऊस बिले थकीत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर वगळता इतर कारखान्यांच्या एफआरपीची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध आहे. या ३३ पैकी २७ कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे दिले नाहीत. ही रक्कम ५१३ कोटी १७ लाख रुपये इतकी आहे. शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम थकवणाऱ्या २७ साखर कारखान्यांपैकी ६० टक्क्यांहून अधिक रक्कम थकवणाऱ्या सहा कारखान्यांबाबत एफआरपी कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
गुरुवारी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात या कारखान्यांची सुनावणी घेण्यात आली. यावेळी कारखानदारांनी आपली बाजू मांडली. प्रादेशिक साखर संचालक कार्यालयाने या कारखान्यांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. जिल्ह्यातील ऊस गळीत हंगाम संपला आहे. मात्र, नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना आपल्या उसाच्या रकमेसाठी कारखानदारांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पांडुरंग सहकारी (श्रीपूर), सहकार महर्षी (अकलूज), विठ्ठलराव शिंदे (पिंपळनेर), ओंकार शुगर (चांदापुरी), विठ्ठलराव शिंदे ( करकंब ), येडेश्वरी शुगर (खामगाव ) या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची पूर्ण रक्कम अदा केली आहे. यातील काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त दर दिला आहे.


















