सोलापूर : सीताराम महाराज कारखान्यामध्ये साडेपाच लाख टन ऊस गाळप, हंगामाची यशस्वी सांगता

सोलापूर : शेतकऱ्यांचा विश्वास, योग्य नियोजन, तांत्रिक आधुनिक व्यवस्थापन आणि सर्व घटकांच्या एकजुटीमुळे यंदा सीताराम महाराज साखर कारखान्याने उच्चांकी, ५ लाख ५४ हजार ३०० मे. टन ऊस गाळप केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्वास सहकार्य हेच कारखान्याच्या यशाचे खरे बळ आहे. पुढील गाळप हंगामात यापेक्षा अधिक उसाचे गाळप करून नवीन विक्रम प्रस्थापित करू, असा विश्वास सीताराम व आष्टी परिवाराचे मुख्य प्रवर्तक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी व्यक्त केला. खर्डी (ता. पंढरपूर) येथील कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

प्रारंभी कारखान्याच्या चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे आणि कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे तसेच काटा व गव्हाणीचे पूजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी कालुंगे गायकवाड यांनी चालू हंगामात कारखान्याने तब्बल ५ लाख ५४ हजार ३०० मेट्रिक टन उसाचे उच्चांकी गाळप केल्याचे सांगितले. कारखान्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अधिकारी, कर्मचारी, ऊसउत्पादक शेतकरी तसेच ऊस वाहतूक ठेकेदार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here